Marathi Rajbhasha Din – 27 Feb 2024

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘लेखक आपल्या भेटीला’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन
: दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषेची
गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य
साधून विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यानगरी बारामती येथे ‘लेखक आपल्या भेटीला’
या सदरांतर्गत प्रसिद्ध लेखक, कथाकार व वक्ते प्रा. विजय काकडे यांचा विद्यार्थ्यांशी प्रकट मुलाखतीचा
कार्यक्रम.आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विजय काकडे सर, शाळेच्या प्राचार्या सौ. जॉयसी जोसेफ यांच्या हस्ते
दीपप्रज्वलन, सरस्वती व ग्रंथ पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मराठी
विषयाच्या शिक्षिका सौ. सुप्रिया गुळवे यांनी विद्यार्थ्यांना मराठी दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेतील
मराठी विषयाचे शिक्षक श्री. संतोष कदम यांनी ‘कथालेखनाचे तंत्र’ या विषयावर आधारित विजय काकडे
सरांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून काकडे सरांनी कथालेखन करताना आवश्यक असे
कथाबीज, कथेतील प्रसंगांची मांडणी, कथेतील पात्रे व संवाद, कथेचा समारोप, कथा लेखनाचा उद्देश,
अभिजात कथालेखनाचे प्रकार इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच
विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले
पाहिजे. असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी विजय काकडे सरांनी ‘अदृश्य साप’ या कथेच्या
कथाकथनाचा प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले व सोबतच कथाकथनाचे धडेही दिले.